आदि कैलास - छोटा कैलास ट्रेक २५ जुलै १९९८ ते २४ ऑगस्ट १९९८



 CAMPININDIA TRAVELOUGE


आदि कैलास - छोटा कैलास ट्रेक 
२५ जुलै १९९८ ते २४ ऑगस्ट १९९८
                        ॐ नमः शिवाय 
                          
१९९६ -१९९७ मध्ये रोज पर्वतीवर जायचो तेव्हा श्री. रामचंद्र भट वय वर्ष ७८, यांच्याशी परिचय झाला. हे बास्पा व्हँलीला जाण्यासाठी माहिती काढून देण्यासाठी मागे लागले. मग फ. सी. रोड वर हॉटेल वैशाली समोर पुस्तकाचे दुकानवाला मित्र मिलिंद हा नुकताच बास्पा व्हँलीला जाऊन आला होता. त्यामुळे सगळी माहिती मिळाली. ट्रेकचे प्लॅनिंगच्या बैठकाही झालेल्या, पण भटांच्या बरोबरच्या इतर काही जणांनी छोटा कैलासला जायचे निश्चित केले. मग कुमाँऊ निगमच्या दिनेश गुरुरानींशी ओळख असल्याने ट्रेकचे प्लॅनिंगची सर्व जबाबदारी स्वीकारली. २५ जूलै १९९८ जायची तारिख पक्की झाली. परतीची तारीख २४ ऑगस्ट १९९८.
गुरुरानींनी पिठोरागढच्या मेरू संस्थेच्या राजू ऐरी, अशोक भंडारी व पुरमलसिंग धर्मशक्तु यांच्याशी बोलणी करून ट्रेक पक्का केला. मी आणि मिलिंद जोगळेकर स्वतः अधी पिठोरागढला जाऊन त्यांना प्रत्यक्ष भेटून सर्व गोष्टींची खातरजमा करून आलो. एक लेखी स्वरूपात देणे, घेणे, टर्म कंडीशन पक्क्या करण्यात आल्या. या रेकी ला जाऊन परत येताना पिठोरागढ ते थलमानी प्रवासात, घाटात दरड कोसळल्याने आमची बस बराच वेळ एकाच जागी थांबली होती. दुपारची वेळ ऊन रणरणत पाणी सम्पलेलं जवळपास काहीच नव्हते. खाली उतरून जरा पुढे चालत गेलो तर रस्त्याचे कामगार रस्त्याच्या बाजूला पत्र्याच्या आडोशात एकत्र चहा बनवत असल्याचे दिसले. जाऊन चोकशी केली… “अरे भाई हमे भी पिलाओ चाय?” त्यावर एकजण म्हणाला क्यू नाही जरूर पिलायेंगे, देखो आपको पसंद हो तो? मग एका छोट्या काचेच्या ग्लास मध्ये काळा चहा व बरोबर एक बारकी गुळाची ढेप. एक घोट चहा प्यायचा आणि एक चावा गुळाच्या ढेपेचा. फक्कड चहा!
ह्या ग्रुपमध्ये एकुण १९ जणांपैकी १६ जण सिनिअर सिटीझन होते. हे सर्वजण नियमितपणे लॉ कॉलेजच्या टेकडीवर जाणारे. १३ पुरुष व ६ स्त्रिया त्यापैकी दोघे ७० च्या वरचे, सात ६० च्या वरचे, सहा ५० च्या वरचे, एक ४० च्या वरची, दोघे ३० च्या वरचे, आणि एक २० च्या, तीन डॉक्टर्स, एक स्वाती बोपन्ना ह्या भट काकांच्या ओळखितल्या १२ वर्षा पुर्वी हाच ट्रेक केलेल्या कुर्गहून आल्या होत्या. (जनरल करिआप्पांची नात / पुतणी) बाकी माझी बहीण, मी व मिलिंद जोगळेकर. कर्वे रोडला भाऊकाका अपट्यांच्या घरी ग्रुप मेंबर्सची बैठक झाली. पुणे ते दिल्ली गोवानिजामुद्दीनने जायचे ठरले.
आदि कैलास - छोटी कैलास ट्रेक 
उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यात वसलेल्या आदि कैलास हे हिंदू पवित्र स्थळांपैकी एक आहे. आदि कैलासला छोटा कैलास म्हणून संबोधले जाते. पिथौरागड जिल्ह्यातील भारतीय प्रदेशात ते भारत-तिबेट सीमेच्या जवळ आहेत. शांत कुमाऊं हिमालयातील आदि कैलास हे हिंदू भाविकांचे लोकप्रिय तीर्थस्थान आहे. छोट्या कैलासच्या पायथ्याशी पार्वती तलावाचे आणि गौरी कुंडचे दर्शन होते. 
या जागेला अधिक धार्मिक महत्त्व देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे हिमालयात वसलेल्या कैलास मानसरोवर, आदि कैलाश आणि किन्नर कैलाश या कैलास त्रिकोणाचा एक महत्वाचा भाग आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार या ठिकाणी भगवान शिव, पार्वती, गणपती आणि कार्तिक स्वामी यांचे सर्वात प्राचीन विश्रांतीस्थान आहे. आदि कैलास ब्रह्मा पर्वता आणि सिनला पास जवळ आहे तर ओम पर्वत नाभीडांग जवळ म्हणजे लीपू पासच्या अलीकडे ७ किमी अंतरावर आहे. 
धारचुला : धारचुलाह काली नदीच्या काठावर व नेपाळ नदीच्या दुसर्‍या बाजूला वसलेले आहे. धारचुलाह हिमालयाच्या व्यापार मार्गावरील प्राचीन व्यापारी शहर होते. १९६२ मध्ये भारत-चिन युद्धानंतर तिबेटशी व्यापार विषयक संभाषणे व संबंध थांबू लागले. धारचूलाची सीमा चीन आणि नेपाळ या दोन्ही देशांशी आहे. आयआयटीबीपी आणि एसएसबी सैन्याने या क्षेत्राची सीमा वाढविली आहे. कैलास मानसरोवर आणि आदि कैलाश ट्रेकचे धारचुला हे बेस कॅम्प आहे. केएमव्हीएन दरवर्षी कैलास मानसरोवर आणि आदि कैलास यात्रेचे आयोजन करते. खासगी गट आणि ट्रेकर्ससाठी जिल्हा न्यायधीश धारचुल्लाकडून ट्रेक परमिट आणि इनर लाइन परमिट घेणे आवश्यक आहे.

२५ जुलै १९९८ रोजी काही जण रात्रीच पुणे रेल्वे स्टेशनवर जाऊन बसले. पहाटे ३.४५ ला गोवा निजामुद्दीनने निघून २७ जुलैला पहाटे ४.३० वाजता आग्र्याला पोचलो. पिथोरागडची बस नुकतीच निघून गेली होती. आपल्याकडील राज्य महामंडळाची बस आपल्याला न्यायला आली नसती. पण १९ जणांचा ग्रुप असल्यामुळे उत्तर प्रदेश महामंडळाची बस विनंती केल्यावर स्टेशनवर आली. मग बदायु, बरेली, पिलीभीत असा प्रवास करत सायंकाळी ५.३० वाजता टणकपुरला पोचलो व रात्री मुक्काम केला. उत्तर प्रदेश निगमचे आवासगृह तसेच जी.बी. पर्वत, वैशाली, चंद्रलोक वगैरे हॉटेल्स आहेत. वाटेत अनेक ठिकाणी सिटोला गवतापासून सुगंधी अर्क काढण्याच्या भट्ट्या दिसल्या. 
२८ जुलैला सकाळी ४ वाजता बस पकडून दुपारी ३ वाजता पिथोरागडला पोचलो. इथून पुढील सर्व व्यवस्था मेरू (Mountain Expedition Rescue Unit) या संस्थेकडे सोपवलेली होती. बस थांब्यावर मेरूचे लोक हजर होते. त्यांनी आणलेल्या जीप्समधून त्यांच्या कार्यालयात गेलो. जेवण झाल्यावर जिल्हा न्यायाधीशांकडे जाऊन Inner Line Permits ताब्यात घेतली. झेरॉक्स ताब्यात घेतल्या. मेरूच्या कार्यालयात काही जणांचे जादा सामान ठेवले. मग आम्हाला ओवाळून तिलक लावला. मिठाई देवून शुभेच्छा दिल्या आणि जीप्स्मधून आम्ही धार्चुलाला जायला निघालो. वाटेत सफरचंद, अक्रोड व चीडाची (pine) झाडे तसेच नंदादेवी व पंचचुली पर्वतरांगा दिसतात. रात्री ८ वाजता धार्चुलाच्या कुमाऊ निगमच्या पर्यटक निवासात पोचलो. रात्री जेवणानंतर दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाचे नियोजन व सूचना सांगण्यात आल्या. बरोबर घेतलेल्या जादाचे सामान इथेच काढून ठेवायचे ठरले. आमच्या बरोबर मेरूचे राजू एरी, पुर्मलसिंग धर्मशक्तू, व अशोक भंडारी हे मार्गदर्शक आणि व्यवस्थापक म्हणून येणार होते.


डे - १> २९ जुलै- धार्चुला ते पांगू (२२ किमी) उंची २२०० मि/७२६० फुट. एकूण चढाई ४८०० फुट.
आज गिरीभ्रमणाची सुरुवात होणार होती. प्रथम १९ कि.मी. अंतरावर असलेल्या तवाघाट या ठिकाणी जीपने सकाळी ६.३० पर्यंत पोचायचे व तेथून ७ वाजता गिरिभ्रमण सुरु होणार होते. परंतु दीड कि.मी. वर दरड कोसळल्याने रस्ता बंद होता. त्यामुळे ३ ते ४ कि.मी. पायी जावे लागले.
पुढे चिखलाचा धबधबा पार करून तिकडे उपलब्ध असलेल्या जीपने काहीजण तवाघातला पुढे गेले आणि काहीजण चालत. असे ९ कि.मी. चालत व १० कि.मी. जीप/डम्परने असे १९ कि.मी. अंतर पार करून सर्वजण १०.३० च्या सुमारास तवाघाटला पोचलो. ११ वाजता इथून खरी ट्रेकला सुरुवात झाली.






१३ कि.मी. अंतर (त्यातील ९ कि.मी. चढाई) आणि ४५०० फुट उंचीवर असलेल्या पांगू या पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणाकडे आमची वाटचाल सुरु झाली. ९ कि. मी. वर ठाणेदार हॉटेल लागते व त्यामुळे ह्या चढाईला ‘ठाणेदार की चढाई’ असेच नाव रूढ झाले आहे. पांगू मुक्कामी पोचायला संध्याकाळचे ६ वाजले.
< ठाणेदार हॉटेल     





डे - २> ३० जुलै- पांगू ते सिरखा (१४ किमी) उंची २५६० मी /८४४८ फुट. एकूण चढाई १२०० फुट
 सिरखा गाव    
मला सिरखा गावात पोचल्यापोचल्या दोन लहान मुले काफाल खाताना दिसली, अंकल हमारो फोटो निकालोना मग त्या जोडगोळीचा एक फोटो काढला आणि त्यांनी मला त्यांच्या जवळची काफलची फळे दिली.  


समुद्रसपाटीपासून पांगू आणि नारायण आश्रम जवळ जवळ एकाच उंचीवर आहेत. सकाळी ७ वाजता निघालो, वाटेत सोसाचा रस्ता चुकल्यामुळे ४ किमीच फटका बसला. मध्येच एक मोठे भूस्खलन झालेले कसरत करीत पार केले आणि ११ वाजता नारायण आश्रमात पोचलो. 
नारायन आश्रमाची इमारत व परिसर अतिशय रम्य आहे, बाजूला फुलझाडांची सुंदर बाग आहे. नारायण स्वामी मुळचे कार्नाटकातले, शिक्षण BSC पर्यंत. ब्रम्हदेश वगैरे टिकाणी नोकरी करून वयाच्या २२ व्या वर्षी १९३६ ते १९४२ मध्ये आश्रम उभारला. स्वामीजींनी १९५६ मध्ये कलकत्ता येथे देह ठेवला. त्यानंतर पूर्वाश्रमी म्ख्याध्यापक असलेल्या ८० वर्षाच्या श्रीमती. शान्तिदेवी आश्रम प्रमुख होत्या. येथून १२.३० ला निघून सिरढांग मार्गे ३.३० वाजता सिरखाला पोचलो. सिर्खाला निगमच्या रेस्ट हाउस समोरील हिमशिखरे फारच सुरेख दिसत होती. अस्कोत जवळील ९/१० गावात इंटर कॉलेज, आरोग्यसेवा वगैरे कामे चालू होती. कॅम्प इन्चार्ज होते तोमरसिंग. 
डे - ३> ३१ जुलै- सिरखा ते गाला (१३ किमी) उंची २४४० मी /८०५२ फुट. एकूण चढाई २४५० फुट.
सकाळी ७ वाजता निघालो, वाटेत समरी गावापुढे ६.५ किमी वरील रुंग्लिंग टॉपपर्यंत प्रचंड चढ, धीर सोडू नका पुढे अपूर्व निसर्ग वाट पाहत अस्ल्याचि पाटी आहे. ९१०० फुटांवरील रुंग्लिंग टॉपवर डावीकडे पूर्णादेवी व कालीमातेचे सुरेख मंदिर आत वाघावर बसलेली अष्टभुजा कालीची धातूचि मूर्ती आहे. या भागाला जंगलचट्टी असेही ओळखले जाते.

पुढे जीवघेणा उतार उतरून सिमखोला जवळील तारांच्या १०० फुटी झुलता पुल पार करुन गालाला पोचलो. गालाला स्वता दिनेशसिंग गुर्रानीजीच कॅम्प इन्चार्ज होते. दिनेशसिंग गुर्रानी शंकराचे निस्सीम भक्त, एक बहुश्रुत, दिलखुलास पहाडी व्यक्तिमत्व कविता लिहिणे, कुमउनी, हिंदी गाणी म्हणणे. सर्व गढवाल व कुमाऊं निगम कर्मचारिंचे लीडर. 
रात्री स्नोहट मध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात सर्वांनी भाग घेतला अगदी पुर्मलसिंग धर्मशक्तू, राजू एरी, अशोक भंडारी तसेच ५५ वर्षच्या दानसिंगने गाण्यच्या तालावर नाचून सर्वांची करमणूक केली.
                                   
याभागात हलकी कामे करणारे सर्व लोक मुळचे ठाकूर. औरंग्जेबाने अनन्वित अत्याचार करून लोकांना मुसलमान होण्याचा आग्रह धरला. मुसलमान व्ह नाहीतर मरा, या लोकांनी दोन्ही गोष्टी नाकारल्या, मग भंगी काम कराल तर जिवंत ठेवीन असे औरंग्जेबाने सांगितले, त्यांनी ते स्वीकारले पण धर्म सोडला नाही. 
डे - ४> १ ऑगस्ट- गाला ते मालपा (१२ किमी) उंची २०५० मी /६७६५ फुट. एकूण चढाई १५०० फुट.
सकाळी ६ वाजता निघालो रस्ता अतिशय खडतर, ४५०० पायर्यांचा प्रचंड उतार उतरून कालीनदीकाठच्या लखनपूर आलो. येथे २-४ हॉटेल्स आहेत तिथे पराठे चांगले मिळाले. पुढे १ किमीवर नेपाळच्या हद्दीत मनाच्या पुलासार्खाच धबधबा दिसला. हा रस्ता काळी नदीच्या अगदी काठावरून जातो.


डोंगराच्या कपारी डोक्याला लागण्याची शक्यता, कारण डोंगर चन्द्र्कोरीप्रमाने कोरून वाट काढलेली आहे.

पुढे ५ किमीवर नजंगगाड पाशी ५६ फुट लांबीचा तारेचा पूल ओलांडून बरेच चडून गेल्यावर दुपारी १.३० ला माल्पाला पोचलो. मालपा गावात घरोघरी लोक गालिछा विणायचे काम रत असल्याचे बघितले. 





माल्पाला कॅम्प इन्चार्ज होते जलाल. रात्री जेवणानंतर कॅम्पफायरवेळी गाण्याचा कार्यक्रमात जलालच्या घरुन आलेल्या चिट्ठीवरून बॉर्डर सिनेमा मधील “चिट्ठी आइ है” गाण्यावरून खूप पिडले आणि मग त्याला चिट्ठी दिली. परतीच्या प्रवासात मालपाहुन निघताना याच जलाल बरोबर मी सकाळी चणा व रोटीची न्याहरी केली होती, दुर्दैव असे की मालपा भूस्खलनातं कॅम्प इन्चार्ज जलालचे प्राण गेले. 
डे - ५> २ ऑगस्ट- मालपा ते बुद्दी (१२ किमी) उंची २७४० मी /९०४२ फुट. एकूण चढाई ६८७० फुट.
भरपूर पाऊस पडत होता त्यामुळे आज ७.१५ ला निघालो, वाटेत लामारीपर्यंत अनेक धबधबे व भूस्खलने काही ठीकाणी गुडघाभर पाणी ओलांडून जावे लागले, पाण्याला जबरदस्त ओढ होती. लामारी जवळ धबधब्यातून दगड येत होते. मग अलीकडे असलेल्या रॉकच्या खाली आधी जाऊन थांबायचे, व आमच्या बरोबरच्या गाईडने खूण करताच पटकन वाटेवरील पाण्याचा प्रवाह ओलांडून पलीकडे जाऊन थांबायचे अशा प्रकारे सर्वानाच ही कसरत करणे भाग झाले. इथून पुढे चालताना एक सिक्वेन्सने पाळण्याचे ठरले, त्याप्रमाणे सगळ्यात जेष्ठ भट काका सर्वप्रथम व मागे दर सहा जणांचे मबरोबर रक गाईड अशा प्रकारे ग्रुपची वाटचाल पक्की केली.   
लामारी जवळचा धबधबां पार करून पुढे गेल्यावर काही अंतरावर भट काका रेनकोट काढण्यासाठी वाटेत थांबले, तोच एक जोरदार ढासळण्याचा आवाज आला, पाहतो तो काय? आमच्याच पुढे आणखीन दहा-बारा फुटांवरची वाट वाहून गेली. थोड्याच वेळात मागे लामारी पाशी पी. डब्लू. डी चे रस्त्याचे काम करणारे कामगार आले आणि आम्हाला जाण्यासाठी वाट काढून दिली. जर का भेट काका थांबले नसते तर मोठा अनर्थ झाला असता.     
बुद्दीला जातानाही पूल ओलांडल्यावर बरीच चढाई लागते संपता संपत नाही. बुद्दीला काही ठीकाणी बुंदी नावाचे बोर्डही आढळतात पण बोली भाषेत सर्वजण बुद्दी असाच उच्चार करताना आढळते. बुद्दीचि कॅम्प साईट फुलांच्या ताटव्यात वसली आहे. समोरच द्रुष्टीस पडतो नमजिंग हिमपर्वत. कॅम्प इन्चार्ज होते गिरधरसिंग मंद्राल.

डे - ६> ३ ऑगस्ट- बुद्दीत विश्रांतीचा दिवस
सकाळी गावा जवळच धर्मसिंग नावाच्या हौशी इसमाने १५-२० प्रकारच्या ओषधी वनस्पतींची लागवड केली होती ते पहायला काही जण गेलो. त्यांनी वनस्पतींची कुमौनी भाषेतील नावे व विवध रोगांवरील उपयोग सांगितले. ह्या भागात एक गुहा आहे व एक कुटुंब मागील कित्येक वर्ष तिथे राहत आहे. 
डे - ७> ४ ऑगस्ट- बुद्दी ते गुंजी (१२ किमी) उंची २७४० मी /९०४२ फुट. एकूण चढाई ६८७० फुट.
३ कि.मी.ची अखंड चढण चढून ३३५० मी. वरील छीयालेक वर पोचलो. इथे आर्मीचा मोठा तळ आहे. अतिशय रम्य ठिकाण, विविध रंगाच्या फुलांनी फुललेलं मोठं पठार, ठिकठिकाणी पाण्याचे अनेक झरे होते.पुढे खिंडीसारखा भाग उतरून आम्ही गर्ब्यांगला पोचलो. गर्ब्यांग हे चिकणी मातीत वसले असल्याने गेल्या काही वर्षांपासून ते जमिनीत खचत चाललंय (त्यामुळेच गर्ब्यांग एक सिंकिंग व्हिलेज म्हणून प्रसिद्ध झाले आहे.)
तिथे सुरेख लाकडी कोरीवकाम असलेली बरीच जुनी घरे पहावयास मिळाली. गाव खचत असल्याने बरेच लोक गाव सोडून गेले आहेत. २ कि.मी. वरील पुलापर्यंत उतारच आहे. पुलावरून पलीकडे नेपाळमधील छानगरु या गावी जाता येते. 

 

पुढे कुटी नदीच्या काठावरून चढउतार करीत नपल्चू या गावापुढे ८० मी. लांबीचा लाकडी पूल ओलांडून गुंजी येथे पोचलो. (१७ कि.मी.) उंची ३२२० मी. /१०६२६ फुट एकूण चढाई ४६९०’. निवासस्थान प्रशस्त. तिथे ITBP चा मोठा तळ आहे. तेथे हेलिपॅड व शिव-काली गणपतीचे एकत्र मंदिर आहे. उत्तरेकडील पर्वत गणपती सारखा दिसतो. माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा मुलगा कैलास-मानस यात्रेला आला असल्याने त्याचे संरक्षकांचा ताफा पुढे थांबला होता. कैलास-मानस यात्रेकरूंची येथे अखेरची तपासणी होते. नापास होणाऱ्यांना येथून परत पाठवतात.
डे - ८> ५ ऑगस्ट- गुंजी ते कालापानी (१० कि.मी.) उंची ३६७८ मी/ १२१३७ फुट. एकूण चढाई ११७०’
हा फार चढउतार नसलेला जवळजवळ सरळ रस्ता. गुंजीतील एका माणसाने इसवी सन १८५३ मध्ये ११५ रुपये खर्च करून बांधला. येथून तिबेटशी मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो. 
कालापानी येथे ITBP चा मोठा तळ आहे. काली नदीचा उगम येथील काली मंदिरात होतो. तेथून ३ टप्प्यात पाणी खाली काढले आहे. सर्व यात्रींना येथे ITBP चहापाणी देते. Inner Line Permit तपासूनच येथून पुढे पाठवतात. येथून वर व्यास गुंफा दिसते. ITBP च्या लोकांनी काली गुंफेत चढून ध्वज लावला आहे. येथील निवासस्थानात दिवे नव्हते. रात्री काली मंदिरात जाऊन भजने म्हटली. . येथे श्री उत्तमसिंग बिश्त हे स्थानप्रमुख होते.  

डे - ९> ६ ऑगस्ट- कालापानी ते नाभिडांग (१० किमी) उंची ४२४६ मी/१४०१२ फुट. एकूण चढाई १३९०’
सकाळी ७ वाजता निघालो. शेवटच्या टप्प्यात ॐ पर्वत दिसू लागला. काही ठिकाणाचे बर्फ ओघळले होते. ११ वाजता नाभिडांगला पोचलो. उजवीकडील डोंगराला नाभिसारखे भोक आहे म्हणून नाभिडांग. येथेही ITBP चा मोठा तळ व हेलिपॅड आहे. निवासस्थानापासून थोड्या उंचीवर १९९१ मध्ये बांधलेले शिवमंदिर आहे. १९९४ मध्ये कुमाऊचे आयुक्त श्री. टोलिया येथे आले तेव्हा त्यांचे हेलीकॉप्टर डोंगरावर आदळून खाली कोसळले पण आतील सर्व लोक सुखरूप राहिले. तेव्हा देवाने वाचविले असे मानून त्यांनी तेथे आणखी एक शिवमंदिर बांधले. येथे निगमच्या बर्याच झोपड्या पण संडास एकाच आहे..

डे - १०> ७ ऑगस्ट- नाभिडांग ते गुंजी एकूण चढाई ९६०’
सकाळी ९.३० पर्यंत वाट पाहूनही धुके न हटल्याने नाईलाजाने परत फिरलो. काली मंदिरापुढे १ किमीवर नदीकाठी गंधकाचा झरा आहे. पुढे वाटेत मानसला जाणारा जथा भेटला. दुपारी २ वाजता गुंजीला पोचलो. सामोरे अपी या हिमशिखराचे दर्शन झाले.    
डे - ११> ८ ऑगस्ट- विश्रांती (राखीपौर्णिमा)
आज राखी पौर्णिमेची जत्रा. सकाळी १० वाजताच जेवून ITBP पासून पुढे व्यास मंदिर आहे तेथे गेलो. त्याचेही वर प्रचंड चढावर शिवमंदिर आहे. ते पाहून खाली राखी मेळ्याच्या मैदानात आलो. रोंगकॉंग नपल्चू, नाणी व गुंजी येथील ४ जथे पारंपारिक वेशभूषा करुन नाचत आले. ध्वजाचे जुने कापड बदलून नवे बसविले. फाफरच्या पिठाचा कच्चा गोळा व गुळपापडीचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटला. ढोल ताशे वाजवण्याच्या स्पर्धेच्यावेळी एका ३ वर्षाच्या मुलाने लोकांना चकित केले. गाणे व नाचाच्या स्पर्धा झाल्या. (फाफरचे धान्य हे नेहमीचे खाणे. याला बियास खोऱ्यात कुतो तर जोसूर खोऱ्यात फाफर म्हणतात. नपलचे शेत जांभळ्या रंगाच्या फुलांनी भरलेले असते. हे धान्य गव्हासारखे असते. यापासून सातूचे पीठ करतात. पलती हे धान्य व्रत किंवा उपासाचे वेळी खातात.) कुटीजवळ कंती, लिम्फिया व मांगशा या तीन खिंडीतून तिबेटला जाता येते. पलीकडे मंगोल नदी आहे. 
डे - १२> ९ ऑगस्ट- गुंजी ते कुट्टी (२१ किमी) उंची ३६५० मी/ १२०४५ फुट. एकूण चढण ५२४२’
पाहते ५.३० ला निघालो. १ किमीवर सुरेख परिसरात काली मंदीर आहे. ६ किमी वर नम्फा गाव. पुढे नदीकाठी एका हिमनगात गुहा तयार होऊन त्यातून एक दगड बाहेर डोकावत होता. कुटी गावानंतरचा १ किमी. फारच त्रासदायक वाटला. दुपारी १२.३० ला कुटीला पोचलो. येथे एकाच खोलीत सर्वांना दाटीवाटीने झोपावे लागले. येथेही परवाना तपासला. श्री. भटकाकांना हवेचा त्रास होऊ लागला म्हणून ITBP च्या डॉक्टरानी तपासून पुढे जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे ते परत मागे फिरले.

डे - १३> १० ऑगस्ट- कुट्टी ते जॉलिंगकॉंग (१४ किमी) उंची ४७७० मी./ १५७४१ फुट. एकूण चढण ५७३०’.
सकाळी दाट धुके. ७.३० पर्यंत वाट पाहून तसेच निघालो. पहिले ६ किमी बरे. पण पुढील ६ किमी जीव काढणारे. शेवट गाठतो की नाही असे झाले. ITBP वरही तपासणी झाली. तेथून १ किमी वर निवासस्थान होते. थोडी विश्रांती घेऊन ४ किमीवरील गौरीकुंडला जायला निघालो. ९५% गेलो. पुढे रस्ता बनवून जायचे होते. पण धुके बनार व अंधारही पडू लागला म्हणून परत फिरलो. गौरीकुंड डमरूच्या आकाराचे असून हिमनगांनी वेढलेले आहे. रात्री भयानक थंडी. पाणी ओढायचे.  
डे - १४> ११ ऑगस्ट- जॉलिंगकॉंग ते छोटा कैलास (२१ किमी) एकूण चढाई ४०००’
आता आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. जॉलिंगकॉंग ते कुट्टी- सकाळपासूनच धुके व पाऊस. ३ किमीवर १ X १.५ किमी आकाराचे पार्वती सरोवर. एकूण चढाई ६००’ काठावर पार्वती व शिवमंदिर. भोवती २.५ किमीचा प्रदक्षिणामार्ग. य्ठेऊन छोटा कैलासचे सुरेख दर्शन झाले. परतताना पार्वतीने लावलेले शेत पहिले. आत तण नाही. धान्य येते आणि नाहीसे होते. उंची तेवढीच राहते. कोणीही हात लावत नाही. परतताना गौरीकुंड दिसले. त्यातून नदी निघते. १२.३० ला निघून ४.३० ला कुट्टीला पोचलो.
डे - १५> १२ ऑगस्ट – कुट्टी येथे पूर्ण विश्रांती.
डे - १६> १३ ऑगस्ट – कुट्टी ते गुंजी . एकूण चढाई १५००’
सकाळी ७ वाजता निघून १२.३० ला गुंजीला पोचलो. १९ किमीपर्यंत पाऊस होता तर ३ किमी स्वच्छ हवा. जवळपास सर्व रस्ता उताराचा
डे - १७> १४ ऑगस्ट – गुंजी ते बुंदी 
सकाळी ८.३० वाजता निघालो. छीयालेखपर्यंत सर्व चढ व तेथून बुंदीपर्यंत सर्व उतार. एकूण चढ ४११’. दुपारी ४ वाजता पोचलो. १५ ऑगस्टला येथे मुक्काम करण्याचे ठरत होते परंतु नंतर आमचे पुढे जायचे ठरले. ही दैवी इच्छा. कारण पुढे काय होणार हे आपल्याला माहीत नसते. मानस यात्रे बरोबरचा एक डॉक्टर नदीत वाहून गेल्याचे येथे समजले.
डे - १८> १५ ऑगस्ट – बुंदी ते मालपा
ध्वजवंदन करुन सकाळी ९ वाजता निघालो.  
काही नवीन भूस्खलने झाली होती ती व एक धबधबा ओलांडून १ वाजता मालपाला आलो. पाऊस चालूच होता. रात्री २.३० चे सुमारास निवासस्थानावर दगड आले पण कोणाला काही इजा झाली नाही. रात्री २.३० ते पहाटे ५.३० पर्यंत आम्ही सर्वजण भीती व काळजीने जागेच होतो. प्रोटोकॉल नुसार पहिले दगड पडल्यानंतर, त्या भागात पुढील ७२ तासात नक्की लँड स्लाईड होणार असे म्हणले जाते. येथील प्रमुख जलाला भेटून त्यानंच्या बरोबर सकाळी मी चणा (हरबऱ्याची उसळ) व परोठे असा नाष्टा केला आणि निघालो. ही आमची शेवटचीच भेट ठरली. 

डे - १७> १६ ऑगस्ट – मालपा ते गाला 
सकाळी ७ वाजता निघालो. वाटेत अनेक धबधबे कोसळत होते. लामारीजवळ एका धबधब्याचा वरून पडणारा पाण्याचा मारा फारच जबर होता. 
श्री. धर्मश्क्तू, राजू आणि अशोक शिवाय ते ओलांडणे अशक्य होते. एका जागी भूस्खलन नुकतेच झाले होते. तेथून येताना बरीच कसरत करावी लागली. लखनपुरजवळ कैलास मानसची बारावी तुकडीतील पर्यटक भेटले. ४५०० पायऱ्यांची चढाई पार करून दुपारी २.३० वाजता गालाला पोचलो. तिथे पाण्याचा नळ तुटल्याने थोडी गैरसोय झाली. तेथून अकरावी तुकडी नुकतीच पांगूकडे रवाना झाली होती.
डे - १८> १७ ऑगस्ट- गाला ते सिरखा ते पांगू
सकाळी ६.३० वाजता निघालो. भटकाकांना दम लागला होता. त्यांना घेऊन रुंगलिंग टॉपला पोचायला ११.३० वाजले. इथून मी आणि राजू एरी आमची सगळ्यांची जेवणाची सोय करण्यासाठी पुढे सिरखला १ वाजताच जाऊन थांबलो. वाटेत जाताना एका ठिकाणी भूस्खलनाचा जोरात आवाज आला असता राजू एरीने मला म्हटले ‘योगेशभाई भाग लो’. त्याप्रमाणे आम्ही दोघे ५ मिनिटे पळत सुटलो. नंतर असे लक्षात आले की समोर नदीपलीकडच्या डोंगरावर भूस्खलन होत आहे. मोठे वृक्ष व मोठे बोल्डर स्लाईड होताना दिसले. 
बाकीची लोकं वाटेत चहापान करून दुपारी २ च्या दरम्यान सिरखाला पोचले. इथे राजू एरीशी बोलून सिरखाला न थांबता थेट पांगुला जाण्याचे ठरले. कारण एकंदरीत परिस्थिती, पावसाचे वातावरण व रस्ता खराब होण्याच्या कळलेल्या बातम्यांचा विचार करून गाला ते सिरखा १४ किमी. व पांगू ते सिरखा १३ किमी असे एकूण अंतर २७ किमी त्याचदिवशी जाण्याचे ठरवले. अन्यथा दुसऱ्या दिवशी रस्ता खराब झाल्याने पांगलाला जीप येऊ शकली नसती तर कदाचित हे २७ किमी आणि पुढचे धारचुलापर्यंतचे २२ किमीचे अंतर एकाच दिवशी पार करावे लागले असते. भटकाका मात्र ३.३० वाजता म्हणजेच सर्वात उशिरा पोचले असून मी लीडर म्हणून घेतलेला निर्णय सर्वांच्या हिताचा व बरोबर असल्याचे सांगून स्वतः ४ वाजता सॅक पाठीला लावून पुढे चालत निघाले, त्यामुळे बाकी सदस्यही त्यांच्या मागोमाग निघाले. परंतु आमच्यापैकी ५ सदस्यांनी सिराखामध्येच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पांगला ते तवाघाट हे १९ किमी अंतर चालून तवाघाटला एकत्र भेटायचे ठरवले. 


डे - १९> १८ ऑगस्ट 
सकाळी ७ वाजता निघालो. थोडयाच वेळात राजूने मागून येऊन सांगितले की भूस्खलन होऊन मालपाचा तळ जाऊन १२व्य तुकडीचे सार्वजण गेले. कानावर विश्वासच बसेना. आपण केवढया संकटातून वाचलो हे समजून देवाचे आभार मानले. तवाघाटला पोचलो तर ITBP चे लोक रेस्क्यूचे सामान घेऊन निघायच्या तयारीतच होते. चिखलाचे २ धबधबे, २/३ भूस्खलने पार करून जीपने धारचुलाला आलो.
प्रथम पुण्याला फोने केले की आम्ही सुखरूप आहोत. तेथून जीपने पिठोरागडला संध्याकाळी ७.३० वाजता पोचलो व्हॅनचा दरवाजा उघडताच ललितमोहन कापडी (कापड व्यावसायिक) ह्यांच्या पत्नीने मला तिथे ओवाळले व म्हणाल्या बस योगेश भाई मै आपकीही राह मे थी. मग दुसऱ्या दिवशी त्यांचे घरी रात्री जेवायला बोलवले होते. 
वाटेत बात रेजिमेंटचे कर्नल ओंकारसिंग भेटले. आमच्याकडे चौकशी केली. आर्मीचे १०० जवान मदतीसाठी पाठवले असे म्हणाले. मेरूचे तेथील लोक Rescue Party घेऊन निघण्याचे तयारीतच होते. भेटीनंतर सर्वांचेच डोळे पाणावले.
१९ ऑगस्टचा दिवस पिठोरागडमधेच काढला. सततचा पाऊस, भूस्खलनाने रस्ते बंद होण्याच्या बातम्यामुळे २० तारखेला बसने नैनीतालला आलो. तेथेही शेजारी भूस्खलन झाले होतेच. २१ चा दिवस तेथे राहून २२ ला दुपारी काठगोदामला आलो. २३ ला पहाटे दिल्ली व २४ ला सायंकाळी पुण्याला पोचलो.


Comments

Popular posts from this blog

४ राजगड ते शिवथरघळ

५ वरंध घाटात कँम्पींग

३ ढाकचा भैरी